Archive

Tag Archives: Ghazal

अश्रूंचा ओसरला पूर
मी निष्कारण चिंतातूर

लाख निसरड्या जागा अन्
मी माझ्या चालण्यात चूर

जवळ तुझ्या मी आलो की
स्वतःपासुनी जातो दूर

प्रेमाच्या आधीच गड्या
कुठे आग अन् कोठे धूर

मृत्यू आला जवळ तरी
जगण्याचा गवसे ना सूर

या दु:खाने जाइल प्राण
त्या दु:खाने फुटेल ऊर

-नितीन भट

ऋतू येत होते , ऋतू जात होते
तरी ताटवे मग्न झुरण्यात होते

म्हणाया तुझे आटणेही अकाली
तुझे दाटणेही अकस्मात होते

समजण्या मला लागला वेळ थोडा
तुझे प्रेम लपले नकारात होते

मला सांग होता कसा दोष माझा ?
जरी ओठ माझे , तुझे दात होते

तरसलो जरी मी , बरसलेच नाही
खुजे मेघ त्या आसमंतात होते

तिथे पाहिली दानवांचीच सत्ता
तिथे देव नुसते पुराणात होते

इथे कोणती लाट घेऊन आली ?
मला हे किनारे कुठे ज्ञात होते ?

- नचिकेत आठवले

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 41 other followers